गणपतीपुळ्यातलेच "प्राचीन कोकण" नावाचे अनोखे म्युझियम. म्युझियम खूप सुंदर आहे आणि अगदी पुन्हा पुन्हा पाहावे असे. गणपतीपुळे गावात आणि मंदिर परिसरात फिरताना अनेक ठिकाणी "प्राचीन कोकण" असे जाहिरात असणारा बोर्ड लावलेला दिसतो आणि येथेच आपली या ठिकाणा बद्दलची उत्सुकता वाढते.
महाराष्ट्र व देश-विदेशातील पर्यटकांना ५०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन कोकणाची माहिती व्हावी व कोकणची पुरातन संस्कृती कळावी या हेतूने कोकण टुरिझम डेव्हलपमेंटने गणपतीपुळे येथे प्राचीन कोकण उभारले आहे. कोकणात पर्यटन विकास होत असताना इथे अत्याधुनिक सोयी उपलब्ध होण्याबरोबरच येथील सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्टय़े लोकांसमोर जायला हवीत, या हेतूनेच ‘प्राचीन कोकण’ या अनोख्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या मोर्डे गावातील पदवीधर तरुण "वैभव सरदेसाई" यांच्या मनात महाविद्यालयीन जीवनापासून कोकणच्या संस्कृतीची महाराष्ट्राला व देशविदेशातील पर्यटकांना, तसेच स्थानिक तरुण पिढीला ओळख करून देण्यासाठी काही तरी वेगळे काम करण्याचा ध्यास होता. याच ओढीतून त्यांनी के.टी.डी.आर.सी.ची स्थापना करून या माध्यमातून गणपतीपुळे येथे प्राचीन कोकण हा भव्य प्रकल्प उभा केला. गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर ३ एकराच्या भव्य परिसरात उभारलेला प्राचीन कोकण हा प्रकल्प नक्कीच पाहण्यासारखा आहे.
गुहा-भुयारे हे ऐतिहासिक कोकणाचे खास वैशिष्टय़ आहे. त्यामुळे प्राचीन कोकणाच्या प्रवेशद्वाराची रचना देखील भल्यामोठय़ा गुहेतून केली असून, क्षणभर ती कृत्रिम आहे यावर विश्वासच बसत नाही. ही गुहा वर्तमानकाळाचे प्रतीक आहे आणि आतील बाजूस आहे ५०० वर्षांपूर्वीचा भूतकाळ. येथून पुढे पाहायला मिळते ते ५०० वर्षांपूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांचे समाजजीवन, खानपान पद्धती, ग्रामव्यवस्था, बारा बलुतेदार व्यवसाय, त्यांची घरे, वेशभूषा आदी खास कोकणातील चालीरीती. लाईफसाईझ मुर्त्यांमधून सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे. सोबत असलेल्या गाईडकडून माहिती ऐकत गावात फेरफटका मारता येतो. येथे एक नक्षत्र बाग आहे ज्यामधे २७ नक्षत्रांना जोडून २७ झाडे दिली आहेत. प्रत्येक जन्मनक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो, त्यानुसार ही नक्षत्र बाग लावण्यात आलेली आहे. भेट देणाऱ्यांनी आपापल्या जन्मनक्षत्रानुसार कुठला आराध्य वृक्ष आहे ते पहायचे. त्यांचे संरक्षण व संगोपन केल्यास आपल्याला ज्ञान, आरोग्य व संपन्नता मिळते असे प्राचीन ग्रंथात उल्लेख आहेत. ती झाडे प्राचीन कोकणामधे पाहायला मिळतात. येथे सुमारे १५० प्रकारची औषधी झाडे लावलेली आहेत.
खोतांचे विशिष्ठ कोकणी घर, नाभिक आणि कोकणातील ग्रामदेवता “वाघजाई” देवीचे मंदिर
प्राचीन कोकण’ येथे कोकणातले सांस्कृतिक वैभव दृष्टिपथास पडते. खोतांच्या घराची रचना, कोळी बांधवांची मासे पकडण्याची खोबणी, छत्रीसारखे वापरले जाणारे इर्ले, कपडे वाळविण्यासाठीची उचल, भातुकली अशा काळाच्या पडद्याआड जाणाऱ्या वस्तूंचं दर्शन या प्रदर्शनात घडतं. गावातील बारा बलुतेदारांचं जीवन उत्तमरितीने मांडतांना त्याची माहितीदेखील तेवढ्याच रोचक पद्धतीने इथले गाईड सांगत असतात. कुंभार, तेली, सुतार, लोहार, न्हावी, सोनार यांचे जीवन जवळून पाहण्याचा अनुभव रोचक असाच असतो. त्याचवेळी त्या काळातील संस्कृती स्पष्ट करणाऱ्या अनेक वस्तू पहायला मिळतात. स्वयंपाकघरातील जुन्या प्रकारचे लाकडाचे पुरणयंत्र, मोदकपात्र, घंगाळे, उखळ आणि स्वयंपाकघराच्या बाजूला असलेल्या पाणवठ्यावर आपली नजर खिळते.
बारा बलुतेदारांपैकी लोहार, सुतार, वाणी आणि कुंभार बारा बलुतेदारांतील सोनार, कासार, बांबूचे काम करणारे कामगार आणि एक कोकणी स्वयंपाकघर
खास विक्रीचे दालन
पर्यटकांना कोकणातील वैशिष्ट्य आठवणींच्या रुपात घरी नेता यावे यासाठी प्रकल्पाच्या शेवटी खास विक्रीचे दालन आहे. त्यात कोकणची वेगळी चव असणारे पदार्थ, सावंतवाडीची लाकडी खेळणी, शंखापासून बनविलेल्या वस्तू अशी विविध प्रकारची खरेदी करता येते.नुकतेच समुद्रकिनाऱ्यातील मत्स्यसंपत्तीचे नवे दालन येथे सुरू झाले आहे.
येथील शंख-शिंपल्यांचे प्रदर्शन तर जरूर भेट द्यावे असेच. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी www.prachinkonkan.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्राचीन कोकणमध्ये प्रवेश फि ५०/- ( पन्नास रुपये) शिवाय कॅमेरा वापरायचा असेल तर २५/- ( पंचवीस रुपये) फि आहे.
मॅजिक गार्डन
प्राचीन कोकण या म्युझियमच्या थेट समोर हे मॅजिक गार्डन आहे.या ठिकाणी आपण काही ईल्युजन राइड, मॅजिक शो, मिरर मेझ इ. लहान मुलांचे मनोरंजन होण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे.
मॅजिक गार्डनची प्रति व्यक्ति प्रवेश फि ३००/- ( तीनशे रुपये) आहे.
********
ही सर्व माहिती संकलित केलेली आहे आणि फोटो आंतरजालावरील आहेत. यात माझे कोणतेही श्रेय नाही याची नोंद घ्यावी.
***********
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा