राजगड - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड (भाग - १)



गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश.

वार शुक्रवार, दिनांक ७/९/२०१२ रोजी, दुपारी २.३० वाजता तवेरा गाडीतून आमच्या सफरीला सुरुवात झाली. गाडी घणसोली तून निघून, ब्राम्ह् काका काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन काकांना घेतले, परत त्यांच्या  घरी म्हणजे तुर्भ्याला गेलो. तुर्भ्याला माझ्या सासुरवाडीतून माझ्या सासूने आमच्या प्रवासासाठी गोड पोळ्या बनविल्या होत्या त्या घेऊन,  ब्रम्ह काकांच्या घरी  त्यांची बेग घेतली, परेश आमची वाट पाहत तेथेच होता. दोघांना घेऊन गाडी कळंबोलीला रवाना झाली. तेथे सचिन आमच्या विनंतीला मान न देता त्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर राजगडावर येण्यास तयार झाला होता. त्याचे वडील त्याला म्हणाले होते, राजगडावर तू कदाचित जाशीलहि पण भावांबरोबर जाण्यात वेगळी मजा आहे, तू जा... सचिन आला. मला खूप आवडले. असो... कळंबोलीतून परेश, सचिन व गाईड आकाश ला घेतले व पुण्याच्या दिशेने निघालो. गाडीमध्ये आता आम्ही   मी (किरण) मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश होतो. राहिले होते ते आमचे पपू काका, आमच्या ट्रेकिंग टीमचे ते कर्नल  होते. ते पुण्याला होते, ते आम्हाला त्यांच्या अल्टो गाडीने नरसापूर येथे भेटणार होते.   मुंबई-पुणे महामार्गावर आमचा प्रवास सुरु झाला, पपू काकांना फोन करून आमच्या लोकेशनची माहिती देत होतो. अखेरीस आम्ही सर्वजन, पुणे सोडून नरसापूर येथे एकत्र  भेटलो.

आता रात्रीचे ८ वाजले होते.  नरसापुरातील बाजारात अजिंक्य व सौरभ साठी शूज घेतले, रात्रीच्या जेवणासाठी दोन किलो चिकन  घेतले. सर्वाना भूक लागली होती. सासुंनी दिलेल्या पोळ्यांचा फडश्या  पाडला, बेकरीतून ढोस्ट, चिवडा घेऊन गाडी सुरु केली.  मागे अल्टो गाडीत आता पपू काका, ब्रम्ह काका,  पी. एस. काका होते.

आमच्या गाडीने वेग पकडला. रात्रीच्या अंधारात थंडगार वारा  अंगावर शहारे आणत होता. अचानक पावसाची सर येऊन आम्हाला चिमटा  काढत होती. रस्त्याच्या बाजूने खळखळ वाहत जाणारे ओढे, आणि धबधबे जणूकाही आमचे स्वागत करत होते. आम्हाला अजून ३० कि.मी. अंतर कापायचे होते.   सौरभ, अजिंक्य व आकाश मनसोक्त निसर्गाचा आनंद लुटत होते. मी, सचिन व परेश निसर्गाच्या  सामर्थ्याचे विश्लेषन करण्यात गुंग होतो.

अल्टो गाडी खूपच मागे असल्याचे जाणवले, फोन करून आमच्या लोकेश्न्ची माहिती देत होतो. मधेच मोबाईलची रेंज जात होती. अल्टो गाडी बरोबर येईल कि नाही याची धाकधूक होती. आमची गाडी गावाच्या छोट्या रस्त्यावरून, छोटे छोटे पूल, खेड गावे ओलांडून  पुढे सरकत होती. एवढ्यात मामा म्हणाले आपल्याला चिकन साठी तेल लागेल, पुढे एक छोटेसे खेडगाव लागले, मी उतरलो तेल आणि काही अंडी घेतली.

थोड्यावेळाने पालखुर्द गावाजवळ पोहोचलो. गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूस लावण्याचे ठरले, मात्र जागा जास्त नसल्याने गाडी लावण्यास कसरत होत होती. मी गाडीतून उतरून जागा निश्चित केली. गाडी स्थिरावली.  सर्वजण गाडीतून मोठ्या तावेने उतरले, परत त्याच वेगाने गाडीत जाऊन आपापल्या बेग उघडून स्वेटर, कान टोपरे शोधू लागली. कडाक्याची थंडी यालाच म्हणतात, अशी थंडीच आम्हाला ओरडून ओरडून सांगत होती.  रात्रीच्या मंद प्रकाशात धुके स्पष्ट  दिसत होती.  हा अप्रतिम प्रसंग केमेऱ्यात कैद करत होतो.

 सौरभ, अजिंक्य व आकाश

आता वेळ होती ती, पपू काकांच्या येण्याची,  काही क्षणात त्याची गाडीची लाईट दुरूनच दिसली, खूप हायसे वाटले. तो पर्यंत गाईड आकाशने  जवळच असलेल्या त्याच्या बहिणीच्या घरी जाऊन आम्ही आल्याची वर्दी दिली. मग आम्ही सार्वजन त्याच्या मागे मागे आपापले समान घेऊन त्या घरी गेलो.

घर खूप छोटेसे होते.. पण मस्त मस्त मस्त... आम्ही येण्याच्या आनंदात बाहेर पाऊस नृत्याचे सर्व मोशन  आम्हाला  नाचवून दाखवत होता. घराच्या बाहेरच सर्वांनी शूज एका लाईनीत रचले. दारासमोरच किचन, चुलीवर काहीतरी शिजत होते, उजव्या बाजूस असलेल्या दारातून आम्ही एका खोलीत प्रवेश केला, ओह!  प्रवेश करताच खोली संपली. खोली अवघी १२ बाय १२ ची असेल. छोटीशी बेटरी घरच्या पत्र्यावर लावली होती. खोलीत बऱ्यापैकी साफसफाई होती. सर्वांनी प्रथम आपापल्या बेग भिंतीच्या कडेला ठेऊन, या  अनुभवाची तारीफ करण्यात मग्न झालो.

(अजिंक्य, पपू काका, पी.एस. काका आणि सचिन)

( परेश आणि मी )


किचन मध्ये, मामा, पी.एस. काका, गाईड आकाश, त्याची बहीण, तिचा नवरा व एक चिमुकला आमच्या जेवणाची तयार करू लागले. बाकी उरलेलं सर्वजण खोली मध्ये बसायला, झोपायला जागेची आवरा आवरी करू लागलो. मामांनी चिकन साठी लागणाऱ्या मसाला त्यांच्या भाषेत वाटण बनवून आणले होते. थोड्या वेळाने चिकनचा खमखमित वास आला. भूक अचानक वाढली, या थंडीत जेवणावर ताव मारत, मनोसक्त थंडीचा आनंद लुटत होतो. बाजरीची भाकरी, मामानी बनविलेल्या चिकनचा गरमा गरम रसा, इंद्रायणी तांदळाचा भात.... मन  तृप्त झाले.  जेवण उरकले . झोपण्याची तयारी केली.  सर्व झोपले.

मी मात्र जागा. हो...मी जागाच होतो.  मनावर खूप दडपण होते. भीती होती. सर्व गोष्टी व्यवस्थित होणे गरजेचे होते. ज्या आत्मविश्वासाने सर्वाना घेऊन इथवर आलो होतो,  अजून खूप पल्ला गाठायचा होता. सर्वाना सुखुरूप घरी न्यायचे होते. तसे आम्ही सर्व सुजाण आहोतच.. पण बाहेर पडणारा पाऊस व कडाक्याची थंडी यामुळे माझ्यावर दडपण वाढत होते. रात्रभर पाऊस वाढत चालला होता. घरच्या पत्र्यावर कोसळणारा पावसाची सीमा संपता संपत नव्हती. विचार करता करता.. शेवटी झोपलो.

कोंबड्याच्या आरवणे कानी पडले. मला जाग आली. मी उठलो, माझ्या बाजूला सचिन, परेश व  ब्रम्ह काका अजून झोपले होते.  पपू काका, अजिंक्य, सौरभ, मामा, पी.एस. काका व आकाश माझ्या आधीच उठून फ्रेश झाले होते. दरवाज्यातून बाहेर पहिले, दुक्यामुळे काहीच दिसत नव्हते. तसाच बसून राहिलो.  मामा म्हणाले, बाहेर काहीच दिसत नाही, खूप थंडी आहे, राजगडावर जायचे का? पपू काकांनी माझ्याकडे पहिले! सचिनला जाग आली होती, तो पण म्हणाला नको जायला. मी म्हणालो, ठीक आहे, सचिन तूच जर शस्त्र खाली टाकलेस तर कसे व्हायचे? मी सुद्धा जबरदस्ती करून घेऊन जाणे चुकीचे आहे, याचा विचार करत होतो.



सचिनला, परेशला घेऊन नैसर्गिक विधी करण्यासाठी त्या घराच्या बाहेर पडलो. तिघांनी तीन बिसलेरीच्या रिकाम्या बोतल घेऊन त्यात पावसाचे पाणी भरले, व  छान जागा शोधू लागलो. पायवाट निसरडी झाली होती. सावकाश पावले टाकत होतो. शेवटी परेश घसरलाच... हसत हसत उठला.. आम्ही पण हसलो. मी परेशचा हात पकडून चालत चालत जाऊ लागलो.  एक ओढा दिसला, तिथेच बसायचे ठरले. सचिन दोन दगड शोधण्यात मग्न होता. शेवटी तिघेहि पुंर्व, पशिम व उत्तरेला बसलो. झाल एकदाच. घरचा रस्ता धरला. रस्त्यात सौरभ आणि आकाश फोटो काढण्यात मग्न होते.









त्या घरी आलो,  त्या थंडीत कसेबसे साबणाने तोंड धुतले. गरम गरम कोरा चहा पियालो, सर्व तरतरीत झालो होतो.  एवढ्यात सचिनने गर्जना केली, आता मागे हटायचे नाही. राजगड सर करायचाच... चला! सर्वजन तयार झालो.  किमान २ डझन अंडी उकडवून घेतली. आपापल्या बेग घेतल्या, राजगडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी रस्ता धरला. आम्हाला आता भोसले वाडीपासून पालखुर्द या खेड्यात जायचे होते, अंतर सुमार ३ कि.मी. होते. चालत चालत आम्ही तिथे पोहचलो. कांदा पोहे खाल्ले, चहा घेतली.. गड सर करण्यासाठी सज्ज झालो. आता इथे सकाळचे ९.३० वाजले होते.










गावच्या कच्चा रस्त्यावरून गडाकडे जाण्यासाठी पावले टाकत पुढे सरकू लागलो. मधेच एक मोठे माळरान लागले. ह्या माळरानापासून गडाची पायवाट सुरु होणार होती. त्यामुळे थोडावेळ विसावा घेण्याचे ठरले, पाणी पियालो, थोडावेळ बसलो, सौरभ, अजिंक्य व आकाश फोटो काढत होते.




आम्ही सर्व एकदिलाने गड सर करण्यास सुरुवात केली. पावसामुळे माती वाहत आल्याने निसरडी झाली होती.  खूप सांभाळून पावले टाकत होतो. पायवाटेच्या दुतर्फा वनवेली, छोटी छोटी झाडे गच्च भरली होती. मधेच पावसाचा वर्षाव होत होता. सचिन आणि परेश जवळ रेन स्वेटर नसल्यामुळे, झाडांचा आसरा घेत, छत्री घेऊन उभे राहत होते.








बरोबर  एका तासाने आम्ही गडाची पायवाट संपविली. थोडा आराम केला. आता मात्र आम्हाला गडाच्या दगडी पायऱ्या चढून वर जायचे होते. पायवाट बरी होतो, पायऱ्या खूप कष्टदायक होत्या. तरीही आम्ही त्याही सर करून पाली दरवाज्यावर जाऊन अभिमाने उभे राहिलो, थकवा निघून गेला होता, फोटो बिटो काढले. परत वर चालू लागलो, शेवटी पदमावती तलावाजवळ पोहचलो, पुढे चालत राजवाड्या जवळ आलो.  राजवाडा पहिला.  पदमावती मंदिराच्या बाजूलाच शंकराच्या मंदिरात आसरा घेण्याचे ठरले. बाहेर पाऊस, धुके व जोरात वाहणारा वारा, निसर्ग आपले सोंदर्य व  शक्ती दाखवत होता असे वाटत होते. थंडीमुळे आमची पुरती वाट लागली होती. तरीही आम्ही मागे हटत नव्हतो. मंदिरात दुक्यामुळे सगळीकडे ओल ओल झाले होते. गाईड आकाश ने सर्व मंदिर कापडाने ३-४ वेळा पुसून घेतले. सर्वांनी बेग मंदिराच्या भिंतीच्या वर लाईनीत लावल्या.

क्रमश :

टिप्पण्या