समुद्र सपाटीपासून १४०० मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला.. हृदयाचे ठोके चुकविणारी नागमोडी वळणे.. क्षितिजाचे नयनरम्य दर्शन.. हिरवाईने नटलेले सह्याद्रीचे कडे.. उंच डोंगरावरून ओसंडून कोसळणारे धबधबे.. थंडगार पावसाच्या सरीमध्ये निसर्ग भ्रमंती.. अथांग पसरलेल्या शिरगाव पिंपळवाडी धरणातील पाणी.. या आणि अशा विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणा-या १२ किमीच्या रघुवीर घाट
रघुवीर घाट पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले असून तीनही मोसमात याठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. घाट परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्याने हा घाट रोजगार निर्मितीला चालना देणारा ठरत आहे. भविष्यात घाटामध्ये बेरोजगारांना रोजगार निर्मितीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. खेड ते रघुवीर घाट या मार्गावरील वेरळ, हेदली, सवेणी, ऐनवरे, कुळवंडी, बिजघर, मिर्ले आदी ठिकाणी प्रेक्षकांना खुणावणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
यामध्ये बिजघर येथील ३७५ वर्षापूर्वीचे पुरातन शंकर-पार्वती-काळकाई-मानाई स्वयंभू देवस्थान व तेथील परिसर खोपी येथील श्रीराम मंदिर, बिजघरचे साईबाबा मंदिर, मिर्लेचे झोलाई मंदिर, तिसंगीचे केदार देवस्थान, कुळवंडीचे स्वयंभू शंकर मंदिर आदींचा समावेश आहे. मात्र, ही स्थळे शासनाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षितच आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील शिंदी व खेड तालुक्यातील खोपी यांच्यातील सिमावर्ती ठिकाण म्हणून शिंदीपासून जवळच राज्यातील प्रसिद्ध तापोळा पर्यटन क्षेत्र आहे.
खोपी शिरगावच्या डोंगर माथ्यावरील हा घाट कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सांस्कृतिक व भौगोलिक दुवा ठरणार आहे. रत्नागिरी व साता-याच्या सीमेवरील हा घाट म्हणजे पहारेकरी, रखवालदाराची भूमिका बजावत आहे. सह्याद्रीतील कोयना अभयारण्यांच्या हद्दीवर रघुवीर घाटात निसर्ग रक्षण आणि पर्यटनाचा नवा मंत्र घुमला आहे. सह्याद्रीच्या एका बाजूला कोयना खोरे आणि घनदाट जंगल तर दुस-या बाजूला डोंगर उतार असलेल्या रघुवीर घाटाचा काही भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट झाला आहे.
यामुळे त्या घाटाचे आणखी महत्त्व वाढले आहे. पश्चिम घाटात समाविष्ट असलेल्या सह्याद्रीमध्ये अनेक औषधी वनस्पती व विविध प्रकारची जैवविविधता आहे. उंचच उंच कडे, त्यावर पडणारे धुके आणि आकाशाला गवसणी घालणारे ढग, हिरवाईने नटलेले डोंगर, काळयाकभिन्न कडयाकपा-या पाहिल्यावर नकळत आपल्याला स्वर्गात असल्याचा आभास होतो. निसर्ग सौंदर्याचे अनोखे दर्शनच येथे होते.
रघुवीर घाटातील शिव सह्याद्री हॉटेल येथे राहण्याची व जेवणाची सोय खूपच छान आहे. चिकन तसेच तेथील गोड पाण्यातील मासे चविष्ट पद्धतीने बनवून देतात. सपंर्क : 092719 32270.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा